Uncategorized

पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर; सावरोली व खालापूरकरांना सतर्कतेचा इशारा, सावरोली मार्गावरील वाहतूक वळवली

 

खालापूर, दिपक जगताप

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सावरोली व खालापूर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नदीकाठावरील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते किंवा साकव ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाताळगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे सावरोली मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून ती खोपोली फाट्यावरून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

खालापूर पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नदीलगतच्या गावांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, नदी व ओढ्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन माहिती मिळाल्यास तातडीने स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे संभाव्य धोके टाळण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!