मुसळधार पावसाचा फटका; खोपोलीतील वैभव दर्शन सोसायटीची संरक्षण भिंत व शौचालय कोसळले

खोपोली, बेधडक महाराष्ट्र : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खोपोलीतील मोगलवाडी परिसरातील वैभव दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे गंभीर दुर्घटना घडली. पावसाच्या तडाख्यामुळे सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली असून, भिंतीलगत बांधण्यात आलेले सोसायटीचे शौचालयही जमीनदोस्त झाले.
ही घटना संतोषी माता स्नॅक्स कॉर्नर दुकानाच्या बाजूलाच घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र संरक्षण भिंत आणि शौचालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानाचा पंचनामा करण्याची तसेच पुढील धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
सततच्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी संरक्षण भिंती, जुन्या इमारती आणि डोंगरालगतच्या भागांमध्ये धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तातडीने नगरपरिषद किंवा प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




