तासगावकर मेडिकल कॉलेजवर बँकेची जप्ती कारवाई; ₹78.21 कोटींच्या थकबाकीमुळे मुख्य प्रवेशद्वारावर पझेशन नोटीस

कर्जत | प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील चांदई येथील नामांकित तासगावकर मेडिकल कॉलेज (सरस्वती एज्युकेशन सोसायटी) विरोधात बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलाइज्ड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखेने मोठी कारवाई करत महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कायदेशीर पझेशन (जप्ती) नोटीस लावली आहे. सुमारे ₹78 कोटी 21 लाख 25 हजार 504 रुपयांच्या थकीत कर्जामुळे ही कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि वसुली पथक अचानक महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला कारवाईची माहिती देत आवश्यक कागदपत्रांची तपासणी व छाननी केली. या कारवाईदरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार, मुख्य कर्जदार व जामीनदार म्हणून नंदकुमार यादवराव तासगावकर, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, डॉ. शशांक रामचंद्र गांगवणे, यादवराव हिराप्पा कांबळे, राजेश यादवराव तासगावकर, वंदना नंदकुमार तासगावकर, सरस्वती यादवराव कांबळे आणि चंद्रशेखर साळगावकर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधितांनी विहित मुदतीत थकीत रक्कम न भरल्याने सरफेसी (SARFAESI) कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचे नोटिशीत नमूद आहे.
या कारवाईअंतर्गत चांदई गावातील सर्वे क्रमांक 18 व 19 मधील महाविद्यालयाची जमीन, इमारती आणि संबंधित मालमत्तेचा ताबा बँकेने घेतल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या मालमत्तेबाबत कोणताही खरेदी-विक्री किंवा इतर व्यवहार करू नयेत, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, महाविद्यालय सुरू असतानाच झालेल्या या कारवाईमुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये शैक्षणिक भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, महाविद्यालयाचे व्यवस्थापन किंवा संबंधित पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.




