Uncategorized

मुसळधार पावसामुळे खोपोलीत पूरस्थिती; नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांची तातडीने पाहणी, उपाययोजनांना वेग

खोपोली, बेधडक महाराष्ट्र : खोपोली शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांनी उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, खोपोली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, शिवसेना-युवासेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांसह पूरग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी नगराध्यक्ष शेंडे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित विभागांना त्वरित उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषदेच्या आपत्कालीन पथकाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्याअनुषंगाने साचलेल्या पाण्याचा उपसा, नाले व गटारांची स्वच्छता, पाण्याचा निचरा सुरळीत करणे तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी तातडीने कामे सुरू करण्यात आली. विविध ठिकाणी यंत्रसामग्रीच्या मदतीने पाणी बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

याशिवाय शहरातील ज्या भागांमध्ये वारंवार पाणी साचते, त्या ठिकाणी कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्यासाठी संबंधित अधिकारी, उपनगराध्यक्ष, सभापती तसेच नगरसेवक-नगरसेविकांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. आवश्यक नियोजन करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

यावेळी नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे म्हणाले, “खोपोलीकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, त्वरित निर्णय घेणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे हीच आमची बांधिलकी आहे. ‘आपली सुरक्षा, आमची जबाबदारी’ या भावनेतून खोपोली नगरपरिषद सातत्याने कार्यरत राहील.”

नगरपरिषदेच्या तातडीच्या हालचालीमुळे अनेक भागांतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली असून नागरिकांनीही प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!