Uncategorized

वांगणीत अवैध धंद्यांवर पोलिसांचा धडक प्रहार; दारू माफिया व मटका अड्ड्यांवर छापे, सात जण ताब्यात

वांगणी | ठाणे

कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी परिसरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत बेकायदा दारू विक्री आणि मटका व्यवसायावर एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार मटका चालकांसह बेकायदा दारूसाठा व विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटकेत एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुप्त माहितीच्या आधारे कुळगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवार, १६ जुलै रोजी वांगणी परिसरातील विविध ठिकाणी छापेमारी केली. वांगणी पश्चिमेतील डोणवाडी येथील एका घरावर टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूसाठा आढळून आला. त्यानंतर आणखी एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथेही देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित दारूचा साठा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

या कारवाईदरम्यान विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या, गावठी दारू तसेच इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारूचा साठा करून विक्री करणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याच मोहिमेत पोलिसांनी वांगणी परिसरातील बेकायदेशीर मटका अड्ड्यांवरही कारवाई केली. या ठिकाणांहून मटका साहित्य, रोख रक्कम आणि इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गुरुवारी सुरू झालेली ही मोहीम मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. पोलिसांनी सातही संशयितांची चौकशी सुरू केली असून, अवैध धंद्यांच्या साखळीतील इतर संबंधित व्यक्तींचा शोधही घेतला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली. अवैध दारू विक्री व मटका व्यवसायाला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या धडक मोहिमा सुरू राहतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

या कारवाईमुळे वांगणी परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, दारू व मटका माफियांचे धाबे दणाणले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!