Uncategorized

रायगडमध्ये मोठी कारवाई; ६ पोलिस कर्मचारी निलंबित

अलिबाग, दि. २३ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (LCB) सहा पोलिस अधिकारी व अंमलदारांवर गंभीर गैरवर्तनाच्या आरोपांवरून कडक कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी केली असून, या निर्णयामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील वरसगाव- कमानी परिसरात एक संशयास्पद महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 03 CP 1623) रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे आढळून आले होते. या वाहनामध्ये अंदाजे २०० किलो तांबे व स्टील धातूचे तुकडे, सुमारे १ लाख रुपयांच्या किमतीचा माल भरलेला होता. या घटनेची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात अदखलपात्र अहवाल क्रमांक ६४/२०२६ अंतर्गत करण्यात आली होती.

या प्रकरणात प्राथमिक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. मात्र, या कारवाईदरम्यान संबंधित पोलिसांनी अवलंबलेल्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनाला शिस्तभंगाचे स्वरूप असल्याचे निदर्शनास आले असून, त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोउनि अविनाश चंद्रकांत पाटील, पोहवा संदीप सुरेश पहेलकर, पोशि बाबासो ज्ञानु पिंगळे, पोशि मोरेश्वर तुकाराम ओमले, पोशि ओंकार संतोष सोंडकर आणि पोशि लालासो महादेव वाघमोडे यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी रायगड-अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत होते.

पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित अधिकारी सेवेत कार्यरत राहिल्यास प्रस्तावित शिस्तभंग कारवाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, निलंबन कालावधीत सर्व संबंधितांना रायगड-अलिबाग नियंत्रण कक्षात दररोज दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी मुख्यालय सोडण्यापूर्वी लेखी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. याशिवाय, सर्व निलंबित कर्मचाऱ्यांना त्यांचे शासकीय साहित्य आणि ओळखपत्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!