खालापूर येथे श्री स्वामी समर्थ मठ प्राणप्रतिष्ठा व धार्मिक सोहळ्याचे आयोजन
स्वर्गीय नरहरी (आण्णा) पाटील यांचे स्वप्न साकार; खालापूरात भव्य श्री स्वामी समर्थ मठ उभा

खालापूर : बेधडक महाराष्ट्र
खालापूर शहरातील श्री स्वामी समर्थ मठाच्या नव्या वास्तूच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ९ मे ते १४ मे २०२६ या कालावधीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. स्वामी भक्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात नामस्मरण, हरिपाठ, प्रवचन, होमहवन, रूद्राभिषेक, भव्य मिरवणूक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. ९ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत खालापूर गावातील मठातून चालन विधी म्हणजे मूर्ती हलविण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर नवीन मठाच्या वास्तूची वास्तुशांती होणार असून सायंकाळी नामस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. १० मे रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत नवीन मठापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून विविध हरिपाठ मंडळांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये वरद विनायक हरिपाठ महिला मंडळ, महड, खालापूर हरिपाठ महिला मंडळ, जय हनुमान प्रासादिक हरिपाठ मंडळ, इसांबे उदकशांती आदी मंडळांचा समावेश आहे.
१२ आणि १३ मे रोजी होमहवन, नामस्मरण, प्रवचन आणि भजनी कार्यक्रम होणार असून विविध भजनी मंडळे भक्तिरसाची मेजवानी देणार आहेत.
गुरुवार दि. १४ मे रोजी सकाळी श्री गणेशपूजन व न्यासपूजनानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. त्यानंतर महाआरती, महाप्रसाद, रूद्रहवन आणि पूर्णाहुतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी रायगड भूषण ह.भ.प. भगवान महाराज कुंभार व ज्ञानेश्वर बुवा पाटील चिंचवली गोहे यांच्या उपस्थितीत भजनी कार्यक्रम रंगणार आहे.
श्री स्वामी समर्थ मठ खालापूरचे संस्थापक स्वर्गीय नरहरी बाळकृष्ण पाटील (आण्णा) यांनी या मठाचा पाया रचला होता. त्यांच्या स्वप्नातील हा भव्य दिव्य मठ आज स्वामी भक्तांच्या लोकवर्गणीतून पूर्णत्वास आला आहे. गुरूवर्य दिपक काका जोशी, धर्माधिकारी गुरूजी आणि सुनिल गुप्ते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडत असून स्वामी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




