कर्जत मुरबाड रोडवर अपघातानंतर वृध्दास मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

कर्जत, दि. २२ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) : कर्जत-मुरबाड रोडवरील कळमकर पोल्ट्री फार्मसमोर अपघातानंतर झालेल्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकावर तिघांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मच्छिंद्र आत्माराम गंगावणे (वय ६८, रा. वंजारवाडी, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कडाव येथून आपल्या घरी स्कुटी (एमएच ४६ बीजी ५२५८) वरून जात होते. कळमकर पोल्ट्री फार्मच्या गेटसमोरील वळणावरून जात असताना मागून आलेल्या रेंज रोव्हर (एमएच ०४ एफए ०९०९) या चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालकाने गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गंगावणे यांनी तत्काळ त्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवली. मात्र गाडीतून उतरलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. चिराग नरेश महेंदु याने त्यांच्या कानावर व डोळ्यावर मारहाण केली, तर सुरभी नरेश महेंदु हिने पोटावर लाथा मारल्या. तसेच नरेश शरण महेंदु याने त्यांच्या दातांवर व पोटावर मारहाण करत रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी काठीने उजव्या हातावर प्रहार केल्याची तक्रार आहे. या हल्ल्यात गंगावणे यांना दुखापत झाली आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी डायल ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित तिघेही रेंज रोव्हर गाडीसह कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
या प्रकरणी मच्छिंद्र गंगावणे यांनी चिराग नरेश महेंदु, सुरभी नरेश महेंदु आणि नरेश शरण महेंदु यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.




