Uncategorized

नागोठणे उड्डाणपुलाचे ‘डोहाळे जेवण’; निकृष्ट कामावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

महाड: निलेश लोखंडे

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुलाच्या पोटाचा भाग फुगल्याने अवजड वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने ‘पुलाचे डोहाळे जेवण’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नागोठणे पुलावर आयोजित करण्यात आला आहे. पुलाचे काम करणारी कंपनी, राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण, जिल्हाधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री, खासदार, आमदार तसेच निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार अभियंत्यांना या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

पुलाला ‘बाळंतपणाच्या कळा’ लागल्याची उपरोधिक टीका करत राष्ट्रवादीने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुलाच्या स्थितीमुळे सध्या अवजड वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी पुलावरून हलकी वाहने सोडण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

“जनतेच्या पैशांचे वाटोळे करून शेवटी जनतेच्या हाती धुपाटणे आले आहे,” असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. निकृष्ट काम करणारे अभियंते आणि भ्रष्टाचाराला पाठबळ देणाऱ्या नेत्यांचे ‘बिंग’ या आंदोलनातून फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या आंदोलनाच्या माध्यमातून नागोठणे उड्डाणपुलाच्या कामाची गुणवत्ता, खर्च आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असताना पुलाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!