स्वामी समर्थ मठातील चांदीच्या पादुकांची चोरी उघड; खालापूर पोलिसांची पुण्यात कारवाई खालापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

खालापूर
:
खालापूर येथील स्वामी समर्थ मठातील मंदिरातून तब्बल १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुकांची चोरी करणाऱ्या दोन संशयितांना खालापूर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत पुणे परिसरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात खालापूर पोलिसांना यश आले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ड) व ३(५) अन्वये २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वामी समर्थ मठातील मंदिरातून अंदाजे ६५६ ग्रॅम वजनाच्या आणि सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका दोन अज्ञात इसमांनी चोरून नेल्या. या दोघांनी पांढरा शर्ट-पायजमा परिधान केला होता. तसेच चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान दोन्ही संशयित एका शाईन कंपनीच्या विना नंबरच्या दुचाकीवरून प्रवास करत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्यांच्या हालचालींचा मागोवा घेत खालापूर फाटा, चौक, दांडफाटा, रसायनी, आपटा, खारपाडा टोलनाका, पेन, कोलाड आणि ताम्हिणी घाट असा मार्ग तपासला. तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित पुणे परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खालापूर पोलिसांच्या पथकाने ६ सप्टेंबर रोजी पुण्यात सापळा रचून दोन्ही संशयितांना अटक करून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीला गेलेल्या चांदीच्या पादुका तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल पाटील आणि खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत PSI हाके, HC जाधव, HC शिनगारे, HC मोरे, PC बोडके, PC खोत, PC मोरे, PC कुमरे आणि PC राठोड यांचा सहभाग होता. खालापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि सतर्कतेच्या जोरावर अवघ्या चार दिवसांत मंदिर चोरीचा तपास पुढे नेल्याने ही कारवाई पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीपैकी एक मानली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान चोरीचा नेमका उद्देश, चोरीचा माल कुठे ठेवण्यात आला आहे तसेच या दोघांचा अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.




