Uncategorized

उद्योगरत्न पुरस्कार विजेते डॉ. चंद्रकांत मोजाड यांच्याकडे शिवसेनेची नवी जबाबदारी; जुन्नर तालुक्यात संघटन बळकटीसाठी सज्ज

मुंबई : बेधडक महाराष्ट्र! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी गेली तब्बल ४५ वर्षे निष्ठेने कार्य करणारे ज्येष्ठ शिवसैनिक, उद्योजक व मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष डॉ. चंद्रकांत तुळशीराम मोजाड यांच्यावर पक्ष नेतृत्वाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची दखल घेत पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर तसेच उपजिल्हा संपर्क प्रमुख दिलीपराव बामणे यांनी संघटन विस्ताराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

मूळचे जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी गावचे सुपुत्र असलेले डॉ. मोजाड हे मुंबईत राहत असले तरी गावाशी त्यांचे नाते आजही अतूट आहे. शिवडी मतदारसंघात शिवसेनेचे कार्य करताना आमदार बाळासाहेब दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर-आंबेगाव तालुका मुंबई रहिवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेत प्रमुख संघटक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत गाव आणि मुंबई यांतील संपर्क कायम ठेवण्याचे कार्य केले.

या प्रवासात स्व. मधुकरराव काशीद, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज पुंडे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, गणेश चौधरी, दिलीपराव तांबोळी आणि वैभव थोरात यांसारख्या सहकाऱ्यांची त्यांना मोलाची साथ लाभली. संघटनेवर अनेक संकटे आली, अनेकांनी साथ सोडली, काहींनी घरभेदी भूमिका घेतली; मात्र निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वार्थाचा विचार न करता पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटना जिवंत ठेवली. याच प्रामाणिकपणाचे फळ म्हणून आज पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

डॉ. मोजाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सर्वांना सोबत घेऊन जुन्नर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिक सक्षम करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. पक्षातील सर्व नेते, उपनेते, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

यावेळी त्यांनी आपल्या दिवंगत पुतण्याची, युवा सेना शाखाधिकारी स्व. तेजस मोजाड यांची भावूक आठवण काढली. “आज तो असता तर हा आनंद अधिक मोठा झाला असता,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांनी स्व. तेजस मोजाड यांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणत श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबईत शाखाप्रमुख दगडूदादा सकपाळ यांच्या काळापासून शिवसेनेचे काम करणारे डॉ. मोजाड यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता संघटन मजबूत करण्यावर भर दिला. आजही खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, शिवसेना सचिव व लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चे मानद सचिव सुधीर साळवी, तसेच बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर ते सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने प्रत्येक निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनाच पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असून, त्यासाठी डॉ. मोजाड यांचा कायम आग्रह राहिला आहे.

नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. चंद्रकांत मोजाड यांना “उद्योगरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक, संघटनात्मक आणि उद्योजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची ही मोठी पावती मानली जात आहे.

जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांबद्दल विशेष आत्मीयता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, किल्ले शिवनेरी किल्ला वर शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहावा, ही त्यांची मनोमन इच्छा आहे. आई शिवाई, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि कुलदैवत खंडोबा यांच्या आशीर्वादाने ही इच्छा पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी लवकरच जुन्नर तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या भेटीगाठी सुरू करणार असल्याचा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!