ताम्हिणी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; दोन आरोपी २४ तासांत जेरबंद

पाली/माणगाव : ताम्हिणी घाट परिसरातील कोंडेथर गावाच्या हद्दीत दरीमध्ये आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या खुनाच्या आरोपावरून दोन संशयितांना अवघ्या २४ तासांच्या आत पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (वय २४) आणि दिनेशकुमार बिसराम प्रजापती (वय २७), दोघेही सध्या चिखली, पुणे येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३५ वाजता ताम्हिणी घाट परिसरातील मौजे कोंडेथर गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव रस्त्यालगत दरीमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली. मृत महिलेची ओळख पटविण्यासोबतच खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृतदेहाची ओळख सुमन गोपाल यादव, रा. चिखली, पुणे, मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश अशी पटली. त्यानंतर महिलेबाबत अधिक माहिती मिळवून तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना दुर्गाप्रसाद प्रजापती आणि दिनेशकुमार प्रजापती यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी संशयितांच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळवत त्यांना पिंपरी-चिंचवड परिसरातून तपासासाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी महिलेला फिरण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाट परिसरात नेले आणि तेथे ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह घाटातील दरीत टाकल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास माणगाव पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेश निंबाळकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व अंमलदार आणि सायबर सेलचे पोलीस हवालदार तुषार घरत यांच्या पथकाने केली.




