अफजल चांदले यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

महाड : निलेश लोखंडे
महाड तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अफजल चंदेल यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह समाजकार्याच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अफजल चंदेल हे महाड तालुक्यातील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी महाड विधानसभा अध्यक्ष, महाड तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष तसेच महाड तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
या सर्व पदांवर काम करताना चंदेल यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले. तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेत नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. समाजातील विविध घटकांशी संपर्क ठेवत त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे.
महाड तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संपर्क आणि संघटनात्मक कामाचा अनुभव लक्षात घेता जिल्हा पातळीवर त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जात आहे.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर चंदेल यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील सहकारी आणि महाड तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नव्या जबाबदारीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे चंदेल यांनी सांगितले.
त्यांच्या या नियुक्तीमुळे महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




