तीन दिवसांच्या वीजकपातीनंतर आमदार थोरवे यांच्या दणक्याने नेरळला दिलासा

कर्जत नेरळ: बेधडक महाराष्ट्र
गेल्या तीन दिवसांपासून नेरळ आणि परिसरात सुरू असलेल्या अघोषित वीजकपातीमुळे नागरिक हैराण झाले होते. पाण्याचा प्रश्न, लघुउद्योगांचे नुकसान, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि व्यापार ठप्प झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट नेरळच्या महावितरण कार्यालयात धाव घेतली. अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी महावितरणच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी होणारा त्रास कोणत्याही कारणास्तव खपवून घेतला जाणार नाही” असे ठणकावून सांगत थोरवे यांनी तातडीने दुरुस्ती करून वीज सुरळीत करण्याचे आदेश दिले.
सलग खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि लहान उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची खंत नागरिकांनी यावेळी मांडली. महावितरणच्या नियोजनावरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.
आमदारांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर महावितरण यंत्रणा खडबडून जागी झाली. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत नेरळमधील बहुतांश भागांमध्ये वीजपूर्ववत झाली.
तीन दिवसांनी लाईट आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले. मात्र उर्वरित भागांमध्येही लवकरात लवकर वीज सुरू करावी, अशी मागणी अजूनही कायम आहे.




