Uncategorized

बारा बलुतेदार अन् अठरा पगड जातींना सोबत घेणार; मराठा क्रांती स्वराज्य संघटनेची खेडमधून रणगर्जना सदानंदराव भोसले यांचा निर्धार

खेडच्या समाज मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी उपस्थिती

खेड | बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन व्यापक समाजकारण उभे करण्याचा निर्धार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी खेड येथे व्यक्त केला. खेडच्या भरणे नाका परिसरातील गणेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य समाज मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना सदानंदराव भोसले म्हणाले की, “मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही प्रत्येक उपेक्षित आणि वंचित घटकाच्या हक्कांसाठी काम करणारे व्यासपीठ आहे. आगामी काळात बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींतील बांधवांना सोबत घेऊन समाजहितासाठी व्यापक चळवळ उभी केली जाईल.”
मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून समाज बांधव, महिला, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात मोठी गर्दी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
पक्षविरहित समाजकारणावर भर
संघटनेची भूमिका स्पष्ट करताना भोसले यांनी पक्षविरहित समाजकारणाला प्राधान्य असल्याचे सांगितले. संघटना कोणत्याही राजकीय पक्षाची बांधील नसून समाजहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात जनहित जपणाऱ्या उमेदवारांना योग्य वेळी संघटनेची भूमिका स्पष्ट केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
महेशराव मोरे यांच्या नियोजनाचे कौतुक
या मेळाव्याचे संयोजक तथा रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे सदानंदराव भोसले यांनी कौतुक केले. गेल्या महिनाभरापासून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोरे यांनी केलेली मेहनत आणि संघटनात्मक बांधणी उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे वाटप
मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शेतकरी आणि समाज बांधवांना नारळ, राजापूरचा आंबा तसेच चिकूची रोपे वितरित करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासोबतच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उपयोगी ठरणाऱ्या फळझाडांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
राज्य आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मेळाव्याला राष्ट्रीय सल्लागार सुरेश कदम, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्याताई राणे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी, राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे, गुजरात राज्य युवा कार्याध्यक्ष करण पवार, बडोदे शहर उपाध्यक्ष राहुल भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र शेलार, जिल्हा सरचिटणीस अंकुशराव चाळके, जिल्हा सचिव विवेक कदम, तालुका सचिव दीपक यादव, तालुका संघटक राजेंद्र मोरे, तसेच शंकर निकम, युवराज गुजर, भागेश शिंदे, नामदेव महाराज सोंडकर, विश्वासराव मोरे, यशवंत मोरे आणि स्वामी भगवान बुवा जंगम यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खेड येथील या मेळाव्यातून बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन व्यापक समाजकारण करण्याचा संदेश देण्यात आला. त्यामुळे आगामी काळात मराठा क्रांती स्वराज्य संघटनेची सामाजिक वाटचाल कोणत्या दिशेने जाते, याकडे कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!