पळसदरी ठाकूरवाडीत भीषण दरड; ५ वाहनांचे नुकसान, रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

कर्जत : बेधडक महाराष्ट्र
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडी येथे सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून दरड दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि तीन दुचाकी अशी एकूण पाच वाहने मलब्याखाली दबली गेली. वाहनांसाठी उभारलेले शेडही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोंगरावरील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने जाऊ शकत नसल्याने ग्रामस्थ आपली वाहने रस्त्यालगतच्या शेडमध्ये उभी करत होते. मात्र पहाटे अचानक दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. काही ठिकाणी रस्त्याचाही भाग खचल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, मंडळ अधिकारी वैशाली पाटील, तलाठी शीतल मंदाडे, ग्रामसेवक अनिल राठोड, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक शरद रोकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, ठाकूरवाडीतील सुमारे १४० ते १४५ आदिवासी कुटुंबांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक रहिवासी गणेश खिरगर यांनी सांगितले की, रात्री दोनच्या सुमारास दरड कोसळून गावाचा मुख्य रस्ता मलब्याखाली गेला. दोन चारचाकी, तीन दुचाकी आणि वाहनांचे शेड मातीखाली दबले असून गावाशी संपर्क तुटला आहे. पुढील काळात पाऊस कायम राहिल्यास आणखी दरड कोसळण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घटनास्थळी प्रशासन, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ संयुक्तपणे मदतकार्य करत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.



