पडवी पठार ग्रामपंचायतीचे सरपंच ललित पांडे यांची तत्पर कामगिरी; गावकऱ्यांच्या श्रमदानातून बंद रस्ता झाला मोकळा


महाड | प्रतिनिधी : वरंध ते पडवी पठार या मार्गावर मुसळधार पावसामुळे मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत साळुंखे यांनी तात्काळ पडवी पठार ग्रामपंचायतीचे सरपंच ललित पांडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
घटनेची माहिती मिळताच सरपंच ललित पांडे यांनी संबंधित प्रशासनाला त्वरित कळविले. मात्र मदत येण्याची वाट न पाहता त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करून श्रमदानाच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेतले. गावकऱ्यांच्या सहकार्याने अल्पावधीतच झाडे तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
सरपंच ललित पांडे यांच्या तत्परतेमुळे आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे वाहतूक पूर्ववत झाली. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची वाट न पाहता लोकसहभागातून केलेल्या या कार्याचे महाड तालुका व पंचक्रोशीतील नागरिकांकडून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सरपंच ललित पांडे तसेच श्रमदानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




