Uncategorized

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त शिवसेना मेळावा व निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान सोहळा ५ जून रोजी खोपोलीत

खोपोली (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव २०२६-२७ निमित्त शिवसेना खालापूर तालुका, खालापूर पंचायत समिती विभाग आणि खोपोली शहराच्या वतीने भव्य शिवसेना मेळावा, निष्ठावंत व ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवार दि. ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी दिली.

या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते विजय कदम, उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, विधानसभा संपर्कप्रमुख ललित शहाणे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तसेच महिला संघटिका सुवर्णा जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या स्थापना काळापासून ते आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहून चढ-उताराच्या काळातही पक्षावर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या आणि तन-मन-धनाने पक्षवाढीसाठी कार्य करणाऱ्या कडवट व निष्ठावंत शिवसैनिकांचा यावेळी जाहीर सन्मान करण्यात येणार आहे.

यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्षासाठी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गौरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिवसेनेच्या विचारांचा प्रचार-प्रसार, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, आगामी राजकीय वाटचालीची दिशा निश्चित करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी नमूद केले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या मेळाव्यातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना, महिला आघाडी तसेच असंख्य शिवसैनिक विशेष मेहनत घेत आहेत. कार्यक्रमासाठी खालापूर तालुका आणि खोपोली परिसरातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!