पळसदरी-तळवली दरम्यान अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; हत्या की अपघात? तपास सुरू

कर्जत : बेधडक महाराष्ट्र
कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी ते तळवली गावादरम्यान रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात अंदाजे 35 ते 40 वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा मृत्यू अपघाती आहे की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पळसदरी-तळवली मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. सुरुवातीला एखाद्या प्राण्याचा मृतदेह असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र दुर्गंधी वाढल्यानंतर काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे एका महिलेचा मृतदेह पडलेला असल्याचे आढळून आले. यानंतर नागरिकांनी तात्काळ कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद रोकडे, हवालदार लालासाहेब तोरवे तसेच त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू नेमका कधी झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार संबंधित महिलेचा मृत्यू सुमारे पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असे सांगितले जात आहे.
मृत महिला कुर्ती व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली होती. तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. मात्र मृतदेह कुजल्याने तिची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलिसांनी मृतदेहावरील कपडे, दागिने आणि इतर बाबींची नोंद घेतली असून परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी सुरू केली आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला की ती एखाद्या अपघाताची बळी ठरली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तसेच तिची हत्या करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आला असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. याशिवाय तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या प्रकरणातील गूढ उकलण्यास मदत होणार आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात मृत्यूची नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
दरम्यान, महामार्गालगत अशा अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने पळसदरी, तळवली तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




