Uncategorized

किशोर साळुंके यांचा बेकायदेशीर बांधकामाविरोधात एल्गार

शिळफाटा परिसरातील बांधकाम थांबवण्याची नगरपरिषदेकडे मागणी

खोपोली : बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी खोपोली नगरपरिषद हद्दीतील शिळफाटा परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर बांधकामाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मौजे शिळ येथील सि.स. नं. १९२१ व १९९५ या जागेवरील बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित बांधकाम परवाना आणि वापर परवाना रद्द करण्याची मागणी त्यांनी नगरसेवकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

किशोर साळुंके यांनी नगरसेविका उज्वला प्रमोद महाडिक, नगरसेवक हरीश काळे आणि नगरसेविका अनिता पवार यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. संबंधित बांधकामासाठी सादर करण्यात आलेल्या नकाशामध्ये रस्ता दाखविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी फक्त अरुंद गल्ली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या मार्गावरून अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवा पोहोचू शकत नसल्यामुळे भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच साईट मार्जिन न सोडता बांधकाम सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

“स्थानिक नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा. खोटे नकाशे आणि कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेल्या बांधकामावर कारवाई करून संबंधित बांधकाम परवाना रद्द करावा,” अशी मागणी किशोर साळुंके यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही केली जात आहे. या निवेदनामुळे खोपोलीतील बांधकाम परवानग्यांच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!