कामगारांच्या हक्कासाठी लढा सुरूच; PF व ECS देणी न दिल्यास आंदोलन – किशोर साळुंके

खोपोली : बेधडक महाराष्ट्र
खोपोली येथील सेल्युलस पल्प प्रा. लि. कंपनीमधील कामगारांच्या प्रलंबित PF फंड व ECS देण्यांच्या प्रश्नावरून बहुजन युथ पँथर संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी कंपनी व्यवस्थापनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन सादर केले.
किशोर साळुंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय राज्यांतील कामगार कार्यरत असून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र त्यांच्या हक्काचे PF फंड तसेच ECS ची देणी प्रलंबित ठेवण्यात आल्याने कामगारांवर अन्याय होत आहे.
“कामगारांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी बहुजन युथ पँथर संघटना नेहमीच संघर्ष करत आली आहे. कंपनीने तातडीने कामगारांची PF व ECS देणी अदा करावीत, अन्यथा कंपनीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा किशोर साळुंके यांनी दिला.
कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना ठामपणे उभी असून, योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी कंपनी व्यवस्थापनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या आर्थिक हक्कांचा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बहुजन युथ पँथर संघटनेकडून करण्यात आली आहे.



