Uncategorized

किरवली जि.प. शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप; पायपीटीतून दिलासा

कर्जत: बेधडक महाराष्ट्र

कर्जत तालुक्यातील किरवली येथील रा. जि. प. शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. या शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी ४ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम वाड्या-वस्त्यांमधून दररोज पायी चालत शाळेत येतात. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी घटकातील असून त्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पालक तुटपुंज्या मजुरीवर उदरनिर्वाह करत असल्यामुळे मुलांच्या शाळेत ये-जा करण्यासाठी स्वतंत्र सोय करणे त्यांना शक्य होत नाही.

या विद्यार्थ्यांना ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता दररोज लांबचा पायी प्रवास करावा लागतो. परिणामी, शाळेत पोहोचण्यापूर्वीच ते शारीरिकदृष्ट्या थकून जातात. या थकव्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असून, अनेकदा मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागतात. ‘पायपीट’ ही त्यांच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरत होती.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत “युनायटेड वे मुंबई” या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला. संस्थेचे प्रोजेक्ट हेड श्री. कश्यप जाधव, प्रोजेक्ट ऑफिसर श्री. राजेश क्षीरसागर तसेच पोषण कार्यकर्ती सौ. वासंती बडेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियंका हरवंदे मॅडम यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर तातडीने उपाययोजना करत किरवली शाळेतील १३ आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची रोजची पायपीट थांबणार असून त्यांना वेळेवर आणि कमी श्रमात शाळेत पोहोचता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम होईल, तसेच शाळेतील उपस्थितीतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सायकली विद्यार्थ्यांसाठी केवळ प्रवासाचे साधन नसून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ करणारे महत्त्वाचे साधन ठरणार आहेत.

विशेष म्हणजे, या उपक्रमाचा विस्तार पुढील वर्षीही करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित आदिवासी विद्यार्थ्यांनाही सायकली उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

दरम्यान, १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले हे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मोठी मदत होत असून, सामाजिक उत्तरदायित्वाचे हे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!