Uncategorized

रसायनी पोलिसांची जलद कारवाई; ६.३० लाखांचा चोरीचा माल २४ तासांत हस्तगत

खालापूर (रायगड) – रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉरच्यून सिटी येथे सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून चोरीस गेलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनिअम सेंट्रींग प्लेट प्रकरणी रसायनी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ एप्रिल रोजी रात्री उशिरा १० ते १२ अनोळखी आरोपींनी संगनमत करून बांधकाम साईटवरून सुमारे २ टन वजनाच्या सेंट्रींग प्लेट टेम्पोमध्ये भरून चोरी केल्याची घटना घडली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळ निर्जन असल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, टायर मार्क आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित टेम्पोचा माग काढला.

टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही तपासात आरोपींनी टेम्पोची नंबर प्लेट काळी करून ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. तरीही पोलिसांनी शिताफीने तपास करत सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचून टेम्पो चालकास ताब्यात घेतले.

चौकशीतून आरोपी विकास रामपाल वाल्मिकी (वय २६, रा. सीबीडी बेलापूर) आणि आताउल्ला उर्फ यासीन अमजलअली खान (वय २५, रा. पळस्पे, पनवेल) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण ६.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन वाहने – दोन टेम्पो (MH-43-BP-9327, MH-43-BP-9127) आणि एक कार (MH-04-CV-0111) जप्त करण्यात आली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी नागरिक, कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटदारांना आवाहन केले आहे की, बांधकाम साईटवर रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक ठेवावेत व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. संशयित व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!