सोन्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला सोन्याची झळाळी ! डॉ. महेश निमणे सोने मूल्यमापन परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

खोपोली : आपल्या कर्तृत्वाने आणि विविध क्षेत्रातील अभ्यासू वृत्तीने ओळख निर्माण केलेले खोपोलीचे सुपुत्र डॉ. महेश निमणे यांनी आणखी एक यश आपल्या नावावर कोरले आहे. दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी पुणे येथे भारत सरकार मान्यताप्राप्त खादी ग्राम उद्योगच्या प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या सोने मूल्यांकन (Gold Valuation) प्रशिक्षण व परीक्षेत त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे खोपोली परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील जे. पी. नाईक सभागृह येथे पार पडलेल्या या प्रशिक्षण व परीक्षेत राज्यातील विविध भागांतील अनेक विद्यार्थी आणि व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत तांत्रिक व अभ्यासपूर्ण मानल्या जाणाऱ्या या कोर्समध्ये सोने शुद्धता तपासणी, बाजारमूल्य विश्लेषण, आधुनिक उपकरणांचा वापर आणि मूल्यांकनातील अचूकता या बाबींचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. या सर्व घटकांमध्ये प्राविण्य मिळवत डॉ. निमणे यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली, ही त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची आणि मेहनतीची पावती आहे.
डॉ. महेश निमणे हे यापूर्वीच वास्तुतज्ज्ञ, न्यूमरोलॉजिस्ट, जेमोलॉजिस्ट आणि पालमिस्ट म्हणून समाजात परिचित आहेत. विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आता गोल्ड व्हॅल्युअर म्हणूनही त्यांची ओळख अधिक बळकट होणार आहे. त्यांच्या या बहुआयामी ज्ञानामुळे समाजातील अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे.
या प्रशिक्षणासाठी पुणे प्रशिक्षण संस्थेचे मुख्याधिकारी डॉ. अनिल कटके यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. निमणे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त झाले, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मार्गदर्शकांना दिले.
डॉ. निमणे यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे खोपोली शहराचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सतत नवनवीन कौशल्य आत्मसात करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. महेश निमणे यांची जिद्द आणि सातत्य. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवले असून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.




