Uncategorized

धाकटी पंढरी ताकई येथे ‘श्री विठ्ठल आध्यात्मिक बाल संस्कार शिबीर’ सुरु

खालापूर : बेधडक महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील धाकटी पंढरी ताकई साजगाव येथे श्री विठोबा देवस्थानच्या वतीने ‘श्री विठ्ठल आध्यात्मिक बाल संस्कार शिबीर’ आयोजित करण्यात आले असून, या शिबिरास २५ एप्रिल २०२६ पासून प्रारंभ होत आहे. अखिलकोट ब्रह्मांडनायक प्रभू पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने व साधुसंतांच्या आशीर्वादाने हे शिबीर पार पडणार असून, ५ मे २०२६ रोजी सांगता होणार आहे.

या शिबिराचे आयोजन श्री विठोबा देवस्थान धाकटी पंढरी ताकई व्यवस्थापक कमिटी तसेच वारकरी संप्रदाय कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. बालकांमध्ये आध्यात्मिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांची जडणघडण व्हावी या उद्देशाने हे शिबीर राबविण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये दररोज सकाळी योगा, प्रार्थना व नाश्त्यानंतर गीतापाठ, मृदंग व गायन प्रशिक्षण दिले जाणार आहे. दुपारी भोजन व विश्रांतीनंतर लाठी-काठीचे प्रशिक्षण तसेच संतचरित्रावर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात येतील. सायंकाळी हरिपाठ, विठ्ठल नामजप व रात्री भजन कार्यक्रम होणार आहेत. अशा शिस्तबद्ध दिनक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शिबिरासाठी ह.भ.प. गजानन महाराज चंद (मृदंग शिक्षक), ह.भ.प. किशोर महाराज वेलमारे, ह.भ.प. शिवाजी महाराज महाडीक (हार्मोनियम शिक्षक), ह.भ.प. विश्वनाथ महाराज पाटील यांसारखे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी असून, वारकरी पोशाख परिधान करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच वही, पेन, ताट-वाटी, झोपण्याची साधने व आवश्यक वस्तू सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेशावेळी पासपोर्ट साईज फोटो सादर करणे बंधनकारक आहे.

हे शिबीर पूर्णतः मोफत असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष अनंत गोविंद पाटील (मो. ८०८७४०६०००) तसेच ह.भ.प. तानाजी महाराज कर्णक (मो. ७२७६०६४२९३) यांच्याशी संपर्क साधावा.

या शिबिरासाठी खालापूर तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य व वारकरी संप्रदायातील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभत असून, भाविकांनीही तन, मन, धनाने सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!