खोपोली पोलिसांची मोठी कारवाई : एक्सप्रेसवेवर १६०० किलो गोमांस जप्त, टोळी जेरबंद
खोपोली, बेधडक महाराष्ट्र

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलजवळील फूड मॉल परिसरात खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १६०० किलो गोमांसासह तीन वाहने जप्त करण्यात आली असून एकूण जप्तीची किंमत सुमारे १४ लाख ६८ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना २ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. खोपोली पोलिसांना डायल ११२ वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ घटनास्थळी धाव घेण्यात आली. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील कि.मी. ३४/८०० येथे संशयास्पद हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी वाहनांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक MH 01 EE 0528) या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश मांसाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहन चालकाने पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न करत भरधाव वेगात गाडी चालवली, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणात आमिर शेख (पूर्ण नाव निष्पन्न नाही), तसेच सुमित चंद्रकांत नाईक, विजय विश्वनाथ डिघोळे आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी श्रीरामपूर ते मुंबई या मार्गावर गोवंश मांसाची अवैध वाहतूक करून विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
या कारवाईत पोलिसांनी १,६८,००० रुपये किमतीचे सुमारे १६०० किलो गोवंश मांस जप्त केले. तसेच ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप, ५ लाख रुपये किमतीची क्रेटा कार (MH 14 GA 2629) आणि ३ लाख रुपये किमतीची टोयोटा इटिओस (MH 03 BC 6721) अशी तीन वाहने जप्त करण्यात आली. ही वाहने एस्कॉर्ट म्हणून वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर प्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ मधील कलम ३२५, २८१, ३(५), मोटार वाहन कायदा कलम १८४ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे करत आहेत.
दरम्यान, आरोपी क्रमांक एकाचा पूर्वीही सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




