
“मी सर्वांना पुरून उरणार आणि विजयी होणार,” अशी भीष्म गर्जना करत सन २०२४ च्या वादळी निवडणुकीत अनेक बलाढ्य शक्तींना नामोहरम करून विजयश्री खेचून आणणारे कर्जत-खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट, लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे हे आज एक “ध्येयवेडे नेतृत्व” म्हणून जनमानसात ठळकपणे उभे राहिले आहेत.
असे म्हणतात की, एखादी व्यक्ती ध्येयाने पछाडली की ते साध्य करेपर्यंत शांत बसत नाही. महेंद्र शेठ थोरवे हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत. आपल्या जिद्दीने, चिकाटीने आणि अथक परिश्रमाने त्यांनी “गगनाला गवसणी” घालत आपल्या मतदारसंघाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. विकासकामे म्हणजे केवळ घोषणा नसतात, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकार करावी लागतात, हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. दिवसाचे तब्बल १८ तास जनतेसाठी धावणारे हे नेतृत्व खऱ्या अर्थाने कार्यसम्राट म्हणून ओळखले जाते.
त्यांचा “पोसरी ते विधानसभा भवन” हा प्रवास अत्यंत खडतर आणि संघर्षमय आहे. साध्या घरातून पुढे येत त्यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या जीवनाच्या अंतरंगात डोकावल्यास एक ध्येयवादी, महत्त्वाकांक्षी आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणतीही तडजोड न करणारा नेता दिसतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी एक सच्चा मावळा म्हणून आपली ओळख निर्माण केली.
त्यांची राजकीय कारकीर्द ही अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. ती जणू “हलाहल” सारखी होती—परंतु ते हलाहल प्राशन करून पचवण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली. संकटे, विरोध, अडथळे यांना न जुमानता ते सतत पुढे जात राहिले, हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.
साधा शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी कर्जत-खालापूर तालुक्यात शिवसेना जिवंत ठेवली. २०१४ साली विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने अनेकांनी हार मानली असती, पण त्यांनी नाही. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि केवळ १८०० मतांच्या फरकाने पराभव पत्करला. मात्र या पराभवाने ते खचले नाहीत. “तू अजून जिंकला नाहीस,” हे मनाशी बाळगून त्यांनी पुन्हा उभारी घेतली.
याच जिद्दीच्या जोरावर २०१९ साली त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि आपल्या नेतृत्वाची छाप उमटवली. त्यानंतर २०२४ सालीही जनतेच्या अपार पाठिंब्याने ते पुन्हा विजयी झाले. हे यश केवळ राजकीय नाही, तर जनतेने दाखवलेला विश्वास आहे.
आमदारकी मिळाल्यानंतर हातावर हात ठेवून न बसता त्यांनी विकासाच्या कामांना प्राधान्य दिले. आजपर्यंत तब्बल २ हजार कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणत त्यांनी गाव, वाडे, पाडे, शहर, प्रभाग आणि ग्रामीण भागापर्यंत “विकासाची गंगा” पोहोचवली. यामुळे कर्जत-खालापूर परिसर सुजलाम-सुफलाम झाला असून पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
त्यांच्या संकल्पनांमधून उभारलेले प्रकल्प हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, थोर निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार, उल्हास नदीच्या तीरावर उभारलेली प्रती पंढरपूर श्री विठ्ठलाची ५२ फुटी भव्य मूर्ती—या सर्व प्रकल्पांमुळे मतदारसंघाची ओळख राज्यभर पोहोचली आहे. आता उभारण्यात येणारी श्रीरामाची ३० फुटी मूर्ती ही देखील भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
या सर्व संकल्पनांमागे केवळ राजकारण नाही, तर संस्कार आणि श्रद्धा आहे. आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारातूनच या कल्पना साकार झाल्याचे ते नम्रपणे सांगतात. समाजातील सर्व घटकांचा विचार करून त्यांनी विकासकामे केली आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि महाराष्ट्र भूषण गजानन बुवा पाटील स्मारक यांसारखी कामे देखील सर्व बहुजन समाजाकडून कौतुकास पात्र ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ एका घटकापुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक असल्याचे दिसून येते.
त्यांच्या या यशस्वी प्रवासामागे अनेकांचा मोलाचा वाटा आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मनोहर दादांची साथ, लहान भाऊ विश्वनाथ यांचे सहकार्य, सावलीसारखा पाठिंबा देणाऱ्या पत्नी सौ. मीना ताई, पुतणे प्रसाद आणि कुटुंबातील सर्व सदस्य यांचे योगदान मोठे आहे. याशिवाय हजारो शिवसैनिकांची प्रचंड ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे.
मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात नवे आयाम गाठले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी “व्हिजन २” अंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी नव्या उंची गाठण्याचा निर्धार केला आहे.
आज कर्जत-खालापूर मतदारसंघात त्यांच्या सारखा लोकप्रतिनिधी, लोकनायक आणि लोकनेता होणे दुर्मिळ आहे. त्यांनी जनतेशी जुळवलेले नाते, केलेली विकासकामे आणि दाखवलेली जिद्द यामुळे ते जनतेच्या मनात कायमचे घर करून आहेत.
राजकीय क्षितिजावर चमकणारा हा “अमूल्य तारा” भविष्यातही असाच तेजस्वीपणे झळकत राहो आणि त्यांच्या हातून अजून असंख्य विकासकामे घडत राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा!



