कर्जत नगरपरिषद निवडणुकीत मनसेची रणनिती ठरली — स्वबळावर लढण्याचा निर्णय लवकरच जाहीर होणार
कर्जत, रायगड/बेधडक महाराष्ट्र

कर्जत – आगामी कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तर्फे आज शहर पातळीवरील एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे विद्यार्थी सेना रायगड अध्यक्ष प्रसन्न बनसेडे, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुका अध्यक्ष यशवंत भावरे, तसेच शहर अध्यक्ष राजेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी मनसेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा गंभीरपणे विचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याच्या शक्यतांचा तपशीलवार आढावा घेतला.या संदर्भातील अधिकृत घोषणा ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात करण्यात येणार असल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.बैठकीदरम्यान मनसेच्या स्थानिक संघटनात्मक बळकटीकरणावरही चर्चा झाली. कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच नगरपरिषदेत पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देण्याच्या मनसेच्या भूमिकेवर भर देण्यात आला.या प्रसंगी मनसे तालुका सचिव प्रदीप पाटील, विद्यमान नगरसेवक हेमंत ठाणगे, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे, मंगेश काणेकर, शहर उपाध्यक्ष मितेश महापुरे, महेंद्र गायकवाड, भारती कांबळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अवधूत अत्रे, महेश लोवांशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.




