कुंडलवाडी नगराध्यक्षपदाच्या रिंगणात सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार?
राजकीय समीकरणात नव्या चेहऱ्याची जोरदार चर्चा!

नांदेड | कुंडलवाडी प्रतिनिधी : श्रीकांत बोलचटवार
कुंडलवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने अनेक ज्येष्ठ नेत्यांसह नवोदित इच्छुकांनीही उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. शहराच्या प्रत्येक गल्ली–बोळात आता फक्त निवडणुकीच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. दरम्यान, या राजकीय गदारोळात एक नवे नाव वेगाने पुढे येत आहे—ते म्हणजे सौ. प्रेरणाताई कोटलावार. राजकीय परंपरा लाभलेले आणि लोकांमध्ये विश्वासार्हतेची छाप असलेले हे घराणे कुंडलवाडीच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहे. प्रेरणाताई हे कै. के. रामलू साहेबाचे नातं सुन होत असून साहेब नगरपरिषदेवर तब्बल ३५ वर्ष नगराध्यक्ष पदावर विराजमान होते. त्यांच्या कार्यकाळात शहरात अनेक विकासकामे झाली होती. त्यामुळे आजही रामलू साहेबांविषयी जनतेत प्रचंड आत्मीयता आणि आदरभाव आहे.
प्रेरणाताई कोटलावार या गजानन कोटलावार यांच्या पत्नी असून उच्च शिक्षा विभूषित आहेत.कोटलावार कुटुंबाचा सामाजिक व राजकीय वारसा त्यांनी आत्मसात केला आहे. शिक्षण, संस्कार आणि लोकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे त्या सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. “महिला नेतृत्वाला संधी मिळावी” अशी मागणी शहरात वाढत असताना, प्रेरणाताईंचा चेहरा एक विकासाचा ताजेपणा घेऊन पुढे येत आहे.
राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, “कोटलावार घराण्याचा जनाधार आजही भक्कम आहे. के. रामलू साहेबांच्या काळात ज्या पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडवल्या गेल्या, ती आठवण आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. या पार्श्वभूमीवर प्रेरणाताई कोटलावार यांना मैदानात उतरवण्याची योजना आखली गेल्यास, त्याचा थेट फायदा त्यांना मिळू शकतो.”
सध्या शहरात भारतीय जनता पक्षाचे संघटन सर्वात मजबूत असल्याचे चित्र आहे. भाजपच्या गोटात नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक आहेत. मात्र, सौ. कोटलावार यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. त्या स्वबळावर जनतेशी संवाद साधत असून, महिलांच्या अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा आणि शहरातील मूलभूत सुविधा या विषयांवर त्यांनी गंभीर अभ्यास केला असल्याचे सांगितले जाते.
कोटलावार कुटुंबाचा राजकीय अनुभव आणि जनतेशी असलेला आत्मीय संबंध या दोन घटकांमुळे प्रेरणाताईंच्या उमेदवारीकडे “नवा चेहरा पण जुनी नाळ” म्हणून पाहिले जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही “स्त्री शक्तीला संधी मिळावी” या भूमिकेतून त्यांना पाठिंबा मिळताना दिसतो आहे.
नगरपरिषद निवडणुकीचा सामना यंदा चुरशीचा होणार हे निश्चित. एका बाजूला सत्ताधारी भाजपचे उमेदवार, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गट अशा विविध पक्षांचे स्थानिक पातळीवरील मजबूत कार्यकर्ते आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत. अशा परिस्थितीत सौ. कोटलावार यांचा प्रवेश राजकारणात समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरू शकतो, असे निरीक्षण तज्ञ व्यक्त करत आहेत.
शहरात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे — “कोटलावार परिवार पुन्हा नगरपरिषदेवर आपली छाप उमटवेल का?” अनेक नागरिकांचा विश्वास आहे की, कोटलावार कुटुंबाने नेहमी विकासाला प्राधान्य दिले. त्यांचा लोकांशी थेट संपर्क हा नेहमीच त्यांच्या राजकीय यशाचा गाभा राहिला आहे. त्यामुळे प्रेरणाताईंच्या उमेदवारीला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी काही दिवसांत भाजपकडून उमेदवारी निश्चित होणार आहे. इच्छुक नेत्यांची मोठी संख्या पाहता, तिकीट कोणाला मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु, सौ. प्रेरणाताई कोटलावार यांनी नगराध्यक्षपदासाठी सज्ज असल्याचे सूतोवाच झाल्याने, कुंडलवाडीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.




