तळवली गावाजवळ अपघात; दिव्यांग व्यक्ती गंभीर जखमी, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या रुग्णवाहिकेची तत्पर सेवा

कर्जत : बेधडक महाराष्ट्र
रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली (राज्य महामार्ग ५४८-अ) मार्गावरील तळवली गावाजवळ गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट २०२६) सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात आपटी (ता. खालापूर) येथील दीपक पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खोपोली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हे पळसदरीहून आपटीकडे आपल्या तीन चाकी स्कुटीवरून जात होते. ते यापूर्वीपासूनच दिव्यांग आहेत. तळवली गावाजवळ त्यांच्या स्कुटीने काही कारणास्तव थांबा घेतला असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

रुग्णवाहिका चालक दत्तात्रय(दादू) दरेकर यांनी तत्परता दाखवत जखमीला त्वरित रुग्णवाहिकेतून खोपोली येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी रोनित दरेकर, सागर रणदिवे,राजू भुते तसेच स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात मोलाचे सहकार्य केले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने वारंवार अपघात होत आहेत. विशेषतः दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित विभागाने या मार्गावर वेग नियंत्रणासाठी उपाययोजना, इशारा फलक आणि सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जखमी दीपक पाटील यांच्यावर संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.




