Uncategorized

पनवेलजवळ गव्हाण फाटा येथे भीषण धूर; केमिकल साठ्याला आग लागल्याची शक्यता

पनवेल : श्रेयस ठाकूर

पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात धूर उसळल्याची घटना समोर आली असून, संबंधित ठिकाणी केमिकल साठ्याला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक मोठ्या आवाजानंतर काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळताना दिसले. परिसरातील गोदामे व कंटेनर यार्डजवळ ही घटना घडल्याचे समजते. धूर इतका दाट होता की काही काळ संपूर्ण परिसर झाकोळून गेला.
या घटनेमुळे जवळील नागरिक व कामगारांनी सुरक्षिततेसाठी धावपळ केली. केमिकल साठा असल्यामुळे आग अधिक धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल व संबंधित यंत्रणा दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किट किंवा केमिकल रिअॅक्शनमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!