पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांसाठी अग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

रायगड-अलिबाग, दि.28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अलिबाग यांच्या पात्र शेतकऱ्यांची यादी दि. 24 जुलै 2026 रोजी प्राप्त झाली आहे. संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संस्थांचे सचिव कार्यालय तसेच बँकेच्या शाखांमध्ये ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अग्रीस्टॅक (Agristack) फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन अग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) करून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भातील संपूर्ण कार्यपद्धती जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, कोणत्याही केंद्रावर या प्रक्रियेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी कोणालाही कोणतीही रक्कम देऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग तनवीर पाटील यांनी केले आहे.




