Uncategorized

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या B1 डब्यात आग; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

कर्जत | प्रतिनिधी

कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या B1 वातानुकूलित डब्यात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळील मंकी हिल परिसरात ही घटना घडली असून, रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

माहितीनुसार, महालक्ष्मी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना लोणावळा–मंकी हिल परिसरात B1 डब्यातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. मध्यरात्रीची वेळ असल्याने अनेक प्रवासी झोपेत होते. अचानक फायर अलार्म वाजल्याने प्रवाशांना जाग आली. डब्यात धूर भरल्याचे लक्षात येताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलविले. वेळेवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मोठी जीवितहानी टळली.

प्राथमिक माहितीनुसार, डब्यातील विद्युत यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. संबंधित डब्याची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!