हजारोंचा मोर्चा; भाई जगदीश गायकवाड यांचा इशारा

पनवेल | बेधडक महाराष्ट्र
पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर प्रश्नांवरून आता नागरिकांचा रोष उफाळून आला असून, येत्या ३० जून २०२६ रोजी पनवेल महानगरपालिकेवर हजारो नागरिकांचा विराट मोर्चा धडकणार असल्याची घोषणा बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते भाई जगदीश गायकवाड यांनी केली आहे. पनवेल येथील पीस पार्क हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
“नागरिकांना पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. महावितरणच्या अनियमित कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच रोडपाली गावातील निवासी भागात डंपिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घातला जात आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही,” असा इशारा भाई जगदीश गायकवाड यांनी दिला.
रोडपाली परिसरातील प्रस्तावित डंपिंग ग्राउंडला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून, यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पनवेलमधील रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज यांसारख्या मूलभूत समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, “लाईट नाही, पाणी नाही, आता डंपिंग ग्राउंडचे करायचे काय?” असा संतप्त सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.
नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ३० जून रोजी पनवेल महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, पनवेल, रोडपाली आणि परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या मोर्चाद्वारे पाणी, वीज, रस्ते आणि डंपिंग ग्राउंडसह विविध नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.




