Uncategorized

कर्जत तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी भाजपाचा ‘एकला चलो रे’चा नारा – किरण ठाकरे

“हीच वेळ आहे, आता भाकरी फिरवण्याची” – दिनेश रसाळ

कर्जत | : दीपक जगताप

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, आज कर्जत-वाजंले येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, तसेच युतीबाबत कार्यकर्त्यांच्या भावना खुलेपणाने मांडण्यात आल्या.

या बैठकीत कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षांतर्गत निर्णय घेताना मंडळ अध्यक्ष व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी स्पष्ट शब्दांत मांडली. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतांचा सन्मान न झाल्यास पक्ष संघटनेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

बैठकीत मार्गदर्शन करताना किरण ठाकरे म्हणाले की, “जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या स्थानिक जनतेच्या विकासाचा कणा आहेत. युती कोणाबरोबर होईल किंवा होणार नाही, याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत; मात्र भाजपाने कोणत्याही परिस्थितीत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवली पाहिजे. परिवर्तन घडवायचे असेल तर ‘एकला चलो रे’ या भूमिकेतून काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.”

किरण ठाकरे यांनी कर्जत तालुक्यातील विकासकामांचा आढावाही यावेळी घेतला. त्यांनी आजपर्यंत कर्जत ग्रामीण भागासाठी सव्वाशे कोटी रुपयांहून अधिक विकास निधी उपलब्ध करून दिला असून, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस कामे केल्याचा उल्लेख करण्यात आला. या विकासकामांमुळे कर्जत तालुक्यातील जनता आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी दिनेश रसाळ यांनी आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांना संबोधित केले.

“हीच वेळ आहे, आता भाकरी फिरवण्याची. आता नाही तर कधीच नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडता येते, त्यामुळे या निवडणुका गांभीर्याने घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान युतीबाबत कार्यकर्त्यांची थेट विचारणा करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी हात वर केले, मात्र शिवसेना शिंदे गटासोबत जाण्यासाठी एकाही कार्यकर्त्याने हात वर केला नाही. या प्रतिक्रियेमुळे कर्जत ग्रामीण तसेच कर्जत शहर भागात भाजप कार्यकर्त्यांची शिंदे गटाविषयी उघड नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या आढावा बैठकीस किरणशेठ ठाकरे, राजेश लाड (मंडळ अध्यक्ष), दिनेश रसाळ (मंडळ अध्यक्ष), राजेश चौधरी, ऋषिकेश जोशी, संभाजी गरूड, महिला मोर्चा महासचिब महाराष्ट्र भाजपा सौ. मृणाल खेडकर, सचिन म्हसकर, विजय हजारे, अक्षय लाड, तसेच विविध बुथ अध्यक्ष, पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!