सामाजिक कार्याची दखल; नरवणचे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मुकणे यांची राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कारासाठी निवड

महाड | निलेश लोखंडे
महाड तालुक्यातील नरवण गावचे सुपुत्र तथा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री. एकनाथ रामा मुकणे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली असून, आगामी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते सत्कार होण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ही बाब नरवण गावासाठी तसेच महाड तालुक्यासाठी अभिमानाची मानली जात आहे.
श्री. एकनाथ मुकणे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. समाजातील गरजू नागरिकांना मदत करणे, ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते होणाऱ्या सत्कारासाठी त्यांची निवड झाल्याने नरवण ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गौरवास्पद निवडीबद्दल ग्रामपंचायत नरवणच्या वतीने श्री. एकनाथ रामा मुकणे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या आपुलकीने उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमास सरपंच श्री. प्रल्हाद रामा शिरशिवकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. अनवरी मुस्ताक चाफेकर, सौ. प्रवीना प्रवीण शिरशिवकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक इरफान भाई चाफेकर, ग्रामसेवक श्री. साईनाथ सरसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. एकनाथ मुकणे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे नरवण गावाचे नाव मोठ्या पातळीवर पोहोचत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गावातील एका सामान्य कुटुंबातून पुढे येत सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एकनाथ मुकणे यांच्या कार्याची राष्ट्रपती भवनाच्या स्तरावर दखल घेतली जाणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या या सन्मानामुळे नरवण गावातील तरुणांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे.




