Uncategorized

दिवा-ठाण्याच्या गगनचुंबी जंगलात फुललेलं कोकणचं एक हिरवंगार बेट : खेड तालुका रहिवाशी सेवा संस्था- सदानंदराव भोसले


ठाणे: प्रतिनिधी
बेधडक महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या इतिहासात कोकणाने नेहमीच त्याग, शौर्य आणि संस्कृतीची पताका फडकवत ठेवली आहे. सह्याद्रीच्या कुशीत, जगबुडी , डूबी नदीच्या पवित्र प्रवाहात न्हाऊन निघालेल्या खेड तालुक्याचा इतिहास हा तर स्वराज्याच्या पराक्रमाशी जोडलेला आहे. याच पवित्र मातीतील लेकरं जेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी, लेकराबाळांच्या शिक्षणासाठी मुंबई-ठाण्याच्या दिशेने निघाली, तेव्हा त्यांच्या मनात एकच हुरहूर होती – आपली माती, आपली माणसं, आपली भाषा तुटू नये.

मुंबईच्या उपनगरात, काँक्रीटच्या जंगलात हरवलेल्या याच माझ्या कोकणी बांधवांना मायेची सावली देण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्यासाठी, एका महापुरुषाने एक इवलेसे रोप लावले. ते रोप म्हणजेच *खेड तालुका, रहिवाशी सेवा संस्था, दिवा.*

आज दिवा-ठाणे येथे केवळ अडीच हजार घरे ही आमच्या खेड तालुक्यातील बांधवांची आहेत. तब्बल सत्तर टक्के वस्तीत आमचे कोकणस्थ आज गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ही केवळ आकडेवारी नाही, तर हा एका संघटनेच्या २३ वर्षांच्या अथक तपश्चर्येचा, रक्ताच्या पाण्याचा परिणाम आहे.

*ज्यांनी स्वप्न पाहिलं, ज्यांनी ते जगलं…*

या संस्थेचे शिल्पकार आहेत एका साहित्यिकाच्या हृदयाचे आणि समाजसेवकाच्या कणखर मनाचे व्यक्तिमत्व – *संस्थापक अध्यक्ष श्री. प्रकाश चव्हाण त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहिलेले संस्थेचे आधारस्तंभ, ज्यांच्या खांद्यावर या वटवृक्षाचा भार आहे, ते मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे*रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आणि संस्थेचे प्राण श्री. कृष्णा शेलार ..!!!

एका उत्तम विचारवंताच्या लेखणीतून समाज घडतो, आणि एका निस्वार्थी कार्यकर्त्याच्या घामातून संघटना उभी राहते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही संस्था. गेल्या २३ वर्षांत या संस्थेने केवळ सणवार साजरे केले नाहीत, तर माणसं जोडली. दिवाळीचा फराळ असो, गणेशोत्सवाची आरास असो, की एखाद्या कुटुंबावर आलेलं संकट… ही संस्था पहिली धावून जाते. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि कला-क्रीडा क्षेत्रात या संस्थेने आपला असा ठसा उमटवला आहे, जो मिटणे अशक्य आहे.

२३ वा वर्धापनदिन : तेजाचा उत्सव आणि भविष्याची मशाल*

या ऐतिहासिक परंपरेचा २३ वा वर्धापनदिन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा, शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दिवा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला लाभले प्रमुख पाहुणे होते, ज्यांच्या नावातच क्रांतीचा इतिहास आहे, असे *मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. सदानंदराव भोसले साहेब.*
ते बोलताना म्हणाले,
“खेड तालुक्यातील आमच्या लेकरांनी दिवा-ठाण्यात जे वैभव उभं केलं आहे, ते पाहून ऊर भरून येतो. प्रकाश चव्हाण आणि कृष्णा शेलार यांनी इवलासा वेल लावला, आज तो गगनावरी गेला आहे. ही केवळ संस्था नाही, ही कोकणच्या अस्मितेची दिवा-ठाण्यातील राजधानी आहे. या संस्थेचे उपक्रम हे केवळ स्तुत्य नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहेत.”

यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना, भविष्यात मराठा क्रांती स्वराज्य संघटना या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली.

उपस्थिती होती एका इतिहासाची…

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, मराठा क्रांती स्वराज्य संघटना राज्य सचिव, निवृत्त पोलीस अधिकारी आनंद जाधव, खेड तालुका संपर्क प्रमुख प्रतीक शेवरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी २३ वर्षांचा लेखाजोखा मांडताना डोळ्यात पाणी आणि ओठांवर अभिमान होता. त्यांनी सांगितले, “आम्ही संस्था काढली नाही, आम्ही एक कुटुंब उभं केलं. जिथे प्रत्येक खेडकराला आपलं हक्काचं घर वाटावं.”

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात चमकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना, उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं – आपल्या कोकणचा, आपल्या खेडचा झेंडा असाच फडकत राहावा.

या सोहळ्यास सलील भोसले, जयसिंग कांबळे, नवनीत पाटील, विजय भोईर, सुरेश मोरे, नागेश गायकवाड, प्रवीण शिबे, प्रदीप बेकर, गौतम कदम, गणेश दवंडे, लक्ष्मण जाधव, अमीत जाधव, सतीश निकम, प्रवीण उतेकर, सौ. अनिता पवार, बबन सपकाळ, उषा मुंढे, सचिव रणजिता मोरे, खजिनदार मिलिंद शिंदे, कार्याध्यक्ष संतोष जोशी आणि शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

शेवटी एकच…

दिवा-ठाण्याच्या धकाधकीत, जिथे माणूस माणसाला ओळखत नाही, तिथे “मी खेडचा” म्हटलं की धावून येणारी शेकडो हात हीच या संस्थेची खरी संपत्ती आहे. ही संपत्ती अशीच वाढत राहो, हीच या २३ व्या वर्धापनदिनी आई काळकाई चरणी प्रार्थना!

या ऐतिहासिक सोहळ्याला आणि आपल्या सर्वांच्या मंगलमय वाटचालीसाठी सदैव शुभचिंतन करणारा आपलाच स्नेहलाभी हितचिंतक सदानंदराव भोसले..!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!