खालापूर | निगडोली दुहेरी हत्याकांडाने तालुका हादरला; वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या

खालापूर, बेधडक महाराष्ट्र!
खालापूर तालुक्यातील निगडोली गावात एका वृद्ध दाम्पत्याची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण खालापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे रघुनाथ दत्तू फराट (वय ७५) आणि सुरेखा रघुनाथ फराट (वय ७२) अशी आहेत. बँकेतून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ फराट हे पत्नीसमवेत निगडोली गावात राहत होते. त्यांची मुले खोपोली आणि खालापूर येथे वास्तव्यास आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर रघुनाथ फराट यांचा मोबाईल बंद लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना संशय आला. काहीतरी अघटीत घडल्याची भीती वाटल्याने नातू आदित्य फराट याला निगडोली येथील घरी पाठवण्यात आले. आदित्यने घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय अधिक बळावल्याने त्याने मागील दरवाजातून घरात प्रवेश केला. घरात शिरताच आजी-आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच आदित्यने आरडाओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी रघुनाथ फराट यांचा धारदार शस्त्राने गळा चिरला होता, तर सुरेखा फराट यांच्या तोंडावर गंभीर वार करण्यात आले होते. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा क्रूरतेपोटी मृतदेहांवर राख आणि पालापाचोळा टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून घरातून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत. ही हत्या घरफोडीच्या उद्देशाने झाली की जुन्या वादातून, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.
या घटनेमुळे निगडोली गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.




