Uncategorized

पोलादपूरात श्रीमद भागवत कथा सोहळ्याचे आयोजन

पोलादपूर : बेधडक महाराष्ट्र

शहरातील उंबरकोंड रस्त्याजवळील हॉटेल राजमुद्रा येथे रविवार दि. 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीमद भागवत कथा प्रारंभ होणार असून रविवार दि. 17 मे रोजी या धार्मिक उपक्रमाची सांगता होणार असल्याची माहिती उद्योजक सुनील मोरे यांनी दिली. श्रीवृंदावन धाम येथील ह.भ.प. भागवताचार्य संतोष महाराज पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून उद्योजक सुनील मोरे यांच्या मातोश्री शांताबाई तुकाराम मोरे यांच्या इच्छेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सायंकाळी 5 ते 8 या वेळेत भागवत कथा होणार आहे. सोमवार दि. 11 मे रोजी व्यासचरित्र, शुक्रदेव चरित्र, परीक्षित चरित्र, कलियुग वर्णन व परीक्षित श्रापकथा यांचे निरूपण होईल. दि. 12 मे रोजी सृष्टी निर्मिती, वराह अवतार, कपिल अवतार व दक्षकथा, दि. 13 मे रोजी ध्रुवचरित्र, भरतराजा चरित्र, अजामेळ चरित्र व नृसिंह अवतार कथा सांगितली जाणार आहे.

दि. 14 मे रोजी गजेंद्र मोक्ष कथा, वामन अवतार, समुद्र मंथन, मोहिनी अवतार, रामावतार व कृष्ण जन्म कथा, तर दि. 15 मे रोजी पुतना उद्धार, कृष्णलीला, गोवर्धन पूजा, रासलीला, कालिया मंथन, कंसवध व रूक्मिणी विवाहाचे वर्णन होणार आहे. दि. 16 मे रोजी कृष्णविवाह, सत्यभामा अहंकार, सुदामा चरित्र, परीक्षित उद्धार व पूजा सांगता होईल. तसेच दि. 17 मे रोजी सकाळी 9 ते 11 वाजता ह.भ.प. भागवताचार्य संतोष महाराज पवार यांचे काल्याचे कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुका वारकरी संप्रदाय, उद्योजक सुनील तुकाराम मोरे आणि श्रीरामवरदायिनी ग्रामस्थ मंडळ काटेतळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात सिंथेसायझर व गायक विकास महाराज गडदे, तबला वादक कार्तिक महाराज हिंगणे, ऑक्टोपॅड वादक दीपक महाराज गोरे, झाकी दर्शन राजू आप्पा मुलंगे जिंतुरे तसेच साऊंड सिस्टीम सेवा शिवाजी रघुनाथ दवंगे आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योजक सुनील मोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!