लोणेरे हत्याकांडातील आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

अलिबाग (रायगड) : लोणेरे येथील गाजलेल्या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग यांना मोठे यश आले आहे. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटनुसार, गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ६४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. १९ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव-लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार (वय ३८, रा. तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याने पीडित महिलेवर कोयत्याने डोक्यावर व हातांवर वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन विशेष पथके तसेच गोरेगाव पोलीस ठाण्याची पथके कार्यरत करण्यात आली होती.
तपासादरम्यान आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास समोर आला असून, त्याच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात २०२१ साली खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ठाणे शहर परिसरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ ठाणे येथे जाऊन विविध लॉज आणि डॉरमेट्रीची तपासणी केली. अखेर आरोपी एका डॉरमेट्रीमध्ये राहत असल्याचे आढळून आले आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे (महाड विभाग) करत असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.




