Uncategorized

खेड नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांना “समाज भूषण पुरस्कार २०२५-२६” जाहीर- महेशराव शंकरराव मोरे

खेड : बेधडक महाराष्ट्र

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे सन २०२५-२६ चा मानाचा “समाज भूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक कार्य, लोकहिताचे उपक्रम आणि शहर विकासातील योगदान याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

ही घोषणा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव शंकरराव मोरे यांनी दैनिक बेधडक महाराष्ट्रशी बोलताना दिली. त्यांनी सांगितले की, “सौ. माधवी बुटाला यांनी खेड शहरात विकासकामे, स्वच्छता मोहीम, नागरी सुविधा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.”

या पुरस्काराबाबत विशेष भेटीदरम्यान मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी स्वतः खेड नगरपरिषदेत जाऊन नगराध्यक्षा सौ. बुटाला यांची भेट घेतली. या भेटीत आगामी सामाजिक उपक्रम, संघटनेची कार्ययोजना तसेच समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

या वेळी नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला यांचे पती राजेश बुटाला हे देखील उपस्थित होते. या सन्मानाबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानत खेड शहराच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी “समाज भूषण पुरस्कार” प्रदान करते. यंदाचा पुरस्कार खेड नगराध्यक्षा यांना जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, हा पुरस्कार केवळ सन्मान नसून समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेण्याचा एक प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकता, विकासकामांची गती आणि नागरिकांशी संवाद वाढविणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक १० मे रोजी साईधाम बिजघर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य व देश पातळीवरील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार असून हा सोहळा भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

या घोषणेनंतर खेड परिसरात आनंदाचे वातावरण असून नगराध्यक्षा सौ. बुटाला यांचे स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने खेड शहराचा अभिमान वाढला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!