रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांची निवड निश्चित
पनवेल, बेधडक महाराष्ट्र

रायगड : रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून मंगेश रामचंद्र वाकडीकर तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली असून महायुतीची सत्ता जिल्हा परिषदेत स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे.
मंगेश वाकडीकर हे उरण विधानसभा क्षेत्रातील केळवणी मतदारसंघातून निवडून आले असून स्थानिक पातळीवर त्यांचे मजबूत संघटन आणि जनसंपर्क आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची संयुक्त सत्ता रायगड जिल्हा परिषदेत स्थापन होत आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सव्वा-सव्वा वर्षांचा कालावधी मिळणार असून शिवसेना शिंदे गटाला अडीच वर्षे सत्तेचा कालावधी मिळणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी मधुकर पाटील यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना नेत्या मानसी दळवी, विकास गोगावले, रसिका केणी, दिलीप भोईर, चंद्रकांत कळंबे, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सुधाकर घारे, अॅड. प्रवीण ठाकूर, अनंत गोंधळी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेत एकूण ५९ सदस्यसंख्या असून सत्ता स्थापनेसाठी ३० सदस्यांची आवश्यकता असते. सध्या शिवसेनेचे २१, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि भाजपचे १५ सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ५ आणि काँग्रेसचे २ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होत असल्याबद्दल पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी मंगेश वाकडीकर आणि मधुकर पाटील यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात विकासाला गती मिळेल आणि जिल्हा परिषदेत जनहिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जवळपास आठ ते नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदेत विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्रितपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला असून आगामी काळात रायगड जिल्हा परिषदेमध्ये विकासाभिमुख निर्णय घेतले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.




