रविवार १५ फेब्रुवारी रोजी बीन व बार्टि यांच्या संयुक्त विद्यमाने महाड येथे एक दिवसीय कोकण स्तरीय धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा ( बिन ) आणि भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ०६.०० या वेळेत कोकण विभागातील सामाजिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महाड येथील भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक नाट्यगृह महाड येथे प्रशिक्षक मा. अमित नरवाडे यांचे एक दिवसीय कोकण स्तरीय धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धम्म प्रचारकांची नितांत गरज आहे. म्हणून या विशेष प्रबोधन व प्रशिक्षण शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सदर प्रशिक्षणास मोठ्या संख्येने आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. आपण उपस्थित राहून धम्म बळवळीत सहभागी व्हावे व उत्तम मंगल पुण्य संपादन करावे ही नम्र विनंती. सदर कार्यक्रमाचे उदघाटन मा. शिवाजी जाधव साहेब (निवृत्त तहसिलदार तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरार्थींना आयोजकांच्या माध्यमातून दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. धम्म शिबीराची उद्दिष्टे –
धम्म प्रचारासाठी एक गांव एक प्रचारक निर्माण करणे. बौद्ध धम्माचा परिचय, क्रांती आणि प्रतिक्रांती समजावून सांगणे. बौद्ध धम्म आणि संघाच्या मुलभूत तत्वांचा परिचय करून देणे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या नवयानाचा प्रचार करणे. धम्म समाजामध्ये कुठे,कधी,कसा, केंव्हा सांगावा याचे प्रशिक्षण देणे. शिबिरार्थीना सूचना – शिबीरात पूर्ण वेळ कालावधीत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सर्व शिबिरार्थींनी लेखन साहित्य सोबत आणायचे आहे. शिबिरार्थींनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.



