रेखा गो. मेहत्तर मॅडम यांच्या सेवापूर्ती समारंभात भावनिक वातावरण; शिक्षक समाजाचा सन्मान ही खरी कृतज्ञता — डॉ. सुनील पाटील
खोपोली नगरपरिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत गाडगेबाबा खो. न. प. प्राथमिक शाळा क्र. १२, ताकई येथील आदरणीय शिक्षिका सौ. रेखा गोविंद मेहत्तर मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने भावनिक वातावरणात सेवापूर्ती समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रसंगी सहकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मॅडम यांना अश्रू दाटलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. मॅडम यांच्या दीर्घ सेवाकाळातील निष्ठा, शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले ममत्व यांची सर्वांनी प्रशंसा केली.
आपल्या मनोगतात मॅडम म्हणाल्या, “शिक्षण ही केवळ नोकरी नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यास आकार देणारी जबाबदारी आहे. मी आज जे काही केले ते माझ्या सहकाऱ्यांच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले.”
त्यांनी नगरपरिषद शिक्षण विभागाप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.या कार्यक्रमात उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, “शिक्षक हा समाजाचा खरा दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात मूल्य, संस्कार आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही खरी कृतज्ञतेची भावना आहे. रेखा मॅडम यांनी आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या सेवेचा आदर्श सर्व शिक्षकांनी ठेवावा.”
डॉ. पाटील पुढे म्हणाले, “रेखा मॅडम यांनी आपल्या अध्यापनातून अनेक पिढ्यांना घडवले. शिक्षण क्षेत्रात अशा निष्ठावान आणि मनापासून काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाजाचा पाया मजबूत राहतो. नगरपरिषद शिक्षण विभागाने अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान सतत करावा.”
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




