Uncategorized

‘एक राज्य, एक टोल’च्या मागणीसाठी रेश्मा चिमण कांबळे यांचे खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन

खालापूर : महाराष्ट्र राज्यात एका चारचाकी वाहनासाठी २४ तासांच्या कालावधीत एकच टोल आकारण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभागाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा रेश्मा चिमण कांबळे यांनी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन दिले.

महाराष्ट्रात प्रवास करताना वाहनधारकांना विविध टोल नाक्यांवर वारंवार टोल भरावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांवर आर्थिक भार पडत असल्याचे कांबळे यांनी निवेदनात नमूद केले आहे. एका चारचाकी वाहनासाठी २४ तासांसाठी एकच टोल आकारण्यात यावा आणि त्या पावतीवर संबंधित वाहनाला राज्यभर प्रवास करण्याची मुभा मिळावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील अनेक रस्त्यांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनधारकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. तसेच वाहनांचे नुकसान आणि देखभालीचा खर्च वाढत असल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

इंधनाचे वाढते दर, महागाई आणि वाहनांच्या वाढत्या देखभाल खर्चाच्या पार्श्वभूमीवर वारंवार टोल आकारणीचा शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी रेश्मा चिमण कांबळे यांनी केली. शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना प्रवास करावा लागतो. प्रत्येक टोल नाक्यावर शुल्क भरावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहन खरेदीच्या वेळी रोड टॅक्स, जीएसटी, नोंदणी शुल्क यांसह विविध कर भरले जातात. त्यामुळे टोल आकारणीच्या पद्धतीत नागरिकांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

‘एक राज्य, एक टोल’ या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करून २४ तासांसाठी एका वाहनाला एकच टोल आकारण्याची व्यवस्था लागू करावी, अशी मागणी रेश्मा चिमण कांबळे यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले असून, या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!