Uncategorized

“स्थानिकांच्या रोजगारासाठी ५० हजार युवक-युवतींची फौज उभी करू”; अनिकेत तटकरे यांचा निर्धार

 

“स्थानिकांच्या रोजगारासाठी ५० हजार युवक-युवतींची फौज उभी करू”; अनिकेत तटकरे यांचा निर्धार

कर्जत : कर्जत-खोपोली-खालापूर परिसरातील स्थानिक युवक-युवतींच्या रोजगाराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, स्थानिकांच्या हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या लढ्याला विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी ठाम पाठिंबा दिला. स्थानिकांच्या रोजगारासाठी आगामी आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी होतील आणि खालापूरमध्ये ५० हजारांची युवकांची फौज उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कर्जत-मुरबाड रोडवरील मुद्रे येथील रॉयल गार्डन येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत अनिकेत तटकरे बोलत होते. यावेळी कर्जत, खोपोली व खालापूर परिसरातील पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.

यावेळी स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना तटकरे यांनी, स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील मुलांना रोजगाराची संधी मिळणार नाही का, असा सवाल उपस्थित केला. रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना योग्य प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा विचार घेऊन स्थानिक युवक आता संघटित झाले असून संघर्षासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

टाटा समूहाच्या देशाच्या औद्योगिक विकासातील योगदानाचा उल्लेख करताना तटकरे यांनी टाटा, बिर्ला, महिंद्रा आणि रिलायन्स यांसारख्या उद्योगसमूहांनी देशाच्या औद्योगिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. मात्र, एखाद्या कंपनीच्या कारभारामुळे स्थानिकांवर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिकांना रोजगार देताना केवळ शासनाने केलेल्या नियमांची अंमलबजावणी पुरेशी नसून स्थानिक युवकांनीही उद्योगांना विश्वास देण्याची गरज आहे, असे तटकरे म्हणाले. स्थानिक कामगारांनी नियमितपणे काम करणे, शिस्त पाळणे आणि उद्योगांच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे. स्थानिक युवकांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि समाजाचीही आहे, असे त्यांनी नमूद केले.

स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर कंपनीविरोधात संघर्ष करताना उद्योगविरोधी भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आपला विरोध कारखानदारीला नाही; आपला लढा स्थानिक युवक आणि युवतींच्या रोजगारासाठी आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

सरकारच्या स्थानिक रोजगार धोरणानुसार स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी ग्रामपंचायती, स्थानिक संस्था आणि उद्योग यांच्यात समन्वयाची गरज व्यक्त केली. स्थानिकांना त्यांच्या परिसरातच रोजगार उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण कुटुंब आणि परिसराच्या आर्थिक विकासाला होईल, असेही त्यांनी सांगितले.

सुधाकरभाऊ घारे यांनी स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही तटकरे यांनी दिली. आगामी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या ताकदीने सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुधाकरभाऊ घारे, भगवानशेठ भोईर, मसूरकर साहेब, राजेशजी लाड, भरतजी भगत, संतोष बैलमारे, दीपक श्रीखंडे, अश्विनीताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!