बॉर्डरवरील जवानांसाठी सकल मराठा परिवार रायगड टीमतर्फे सलग चौथ्या वर्षी राख्या रवाना


खोपोली : देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत भारतमातेचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी सकल मराठा परिवार रायगड टीमच्या वतीने सलग चौथ्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी प्रेमाने तयार केलेल्या राख्या रवाना करण्यात आल्या.
या उपक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर शाळा क्रमांक ९, चिंचवली शेकीन तसेच पूर्व प्राथमिक शाळा, खोपोली येथील लहान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तसेच जमा केलेल्या विविध आकर्षक राख्या सकल मराठा परिवाराच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. चिमुकल्यांनी तयार केलेल्या या राख्यांमधून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांविषयीचा आदर, प्रेम आणि देशभक्तीची भावना प्रकर्षाने दिसून आली.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण मानला जातो. मात्र, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना अनेकदा आपल्या कुटुंबीयांपासून आणि प्रियजनांपासून दूर राहून हा सण साजरा करावा लागतो. अशा परिस्थितीत जवानांना बहिणीच्या प्रेमाची जाणीव व्हावी, त्यांचे मनोबल वाढावे आणि समाज त्यांच्या त्यागाची दखल घेत आहे, हा संदेश पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत आहे.
या स्तुत्य उपक्रमाच्या वेळी सकल मराठा परिवाराच्या जिल्हा समन्वयक रूपाली पिलाने, तालुका समन्वयक ॲड. संदीप नाणेकर, किशोर भोसले आणि शंकर पिलाने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर शाळा क्रमांक ९, चिंचवली शेकीनचे मुख्याध्यापक श्रीराम पवार सर, पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या सौ. समीक्षा डोके मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना जवानांच्या कार्याची आणि त्यागाची माहिती देण्यात आली. देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर तैनात असलेले जवान ऊन, वारा, पाऊस, बर्फ आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षितपणे आपले दैनंदिन जीवन जगू शकतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना पाठविणे ही केवळ एक औपचारिकता नसून देशसेवेचा एक छोटासा भावनिक दुवा आहे. या राख्यांमधून सीमेवर तैनात जवानांना ‘देशातील नागरिक आपल्या पाठीशी आहेत’ असा विश्वास मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे विशेष कौतुक करण्यात आले.
सकल मराठा परिवार रायगड टीमच्या वतीने सलग चौथ्या वर्षी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी, देशभक्ती आणि जवानांप्रती कृतज्ञता यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जवान सीमेवर, तर समाज त्यांच्या पाठीशी या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम आगामी काळातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.




