Uncategorized

पळसदरी डॅमजवळ भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

अर्धवट रस्ता व अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांचा संताप; श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी

कर्जत : बेधडक महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली (राज्य महामार्ग ५४८-अ) मार्गावरील पळसदरी डॅमजवळ गुरुवार (दि. ६ ऑगस्ट) रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर अर्धवट राहिलेल्या रस्त्याच्या कामावर आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ताकई येथील मित्रांचा एक गट साजगाव येथील चालकासह माथेरानच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या रोहित वाघमारे (रा. पोशीर) यांच्या दुचाकीची वॅगनर कारशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर मागे बसलेली अंबरनाथ येथील सोनाली हिला गंभीर दुखापत होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक रोहित वाघमारे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पळसदरी यांची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक दत्तात्रय दरेकर यांनी त्वरित सेवा उपलब्ध करून दिली. स्थानिकांच्या मदतीने जखमीला उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे जखमीला तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली.

दरम्यान, कर्जत-खोपोली मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून काही ठिकाणी रस्त्याची रुंदी अचानक कमी होते. तसेच आवश्यक इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स, परावर्तक चिन्हे आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अनेक शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून मिळालेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्याचे काम रखडले असून मार्ग अर्धवट अवस्थेत आहे. सध्या भूसंपादन विभागात हालचाली सुरू असल्या तरी मोबदला रखडल्याने काम पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

या मार्गावर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे “पळसदरीचा अर्धवट रस्ता आणखी किती जणांचा बळी घेणार?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

या अपघाताप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!