खालापूर तालुका संघटकपदी प्रतिक मोरेश्वर शिंदे यांची नियुक्ती

खालापूर : मराठा समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या खालापूर तालुका संघटकपदी युवा कार्यकर्ते प्रतिक मोरेश्वर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदिप गोरे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.
प्रतिक मोरेश्वर शिंदे हे तरुणांमध्ये सक्रिय असून, विविध सामाजिक, सार्वजनिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. तसेच ते शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही कार्यरत आहेत. युवकांशी असलेला संपर्क, समाजकार्यातील सहभाग आणि सामाजिक प्रश्नांबाबतची भूमिका याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर खालापूर तालुक्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे.
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात प्रतिक शिंदे यांनी समाजासाठी तन, मन आणि धन अर्पण करून कार्य करण्याची भावना जपली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा, तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार त्यांनी पुढील काळात प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्राद्वारे प्रतिक शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या नियुक्तीमुळे खालापूर तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी युवकांची मोठी फळी उभी करण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
खालापूर तालुक्यात मराठा समाजाशी संबंधित विविध प्रश्न, युवकांचे प्रश्न, शैक्षणिक व सामाजिक विषय तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करण्याचे आव्हान आता प्रतिक शिंदे यांच्यासमोर आहे. गावागावातील युवकांना संघटित करून सामाजिक उपक्रमांना चालना देणे, समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचविणे आणि समाजाच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे यासाठी ते आगामी काळात सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




