पडवी पठार श्री हनुमान सेवा ग्राम विकास मंडळाच्या प्रथम स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध मान्यवरांचा सत्कार

कल्याण (प्रतिनिधी): पडवी पठार श्री हनुमान सेवा ग्राम विकास मंडळाच्या वतीने आयोजित प्रथम स्नेहसंमेलन व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक ३१ मे २०२६ रोजी महाड तालुका मराठा समाज सेवा संघ येथे आयोजित या कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी सादर केलेल्या विविध कलागुणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशराव चव्हाण, उद्योजक संजय गणपत साळुंके, अरविंद मालुसरे, सुरेश म्हस्के, सुरेश जागडे, शिवाजी शेलार, चंद्रकांत कदम तसेच अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, सरचिटणीस संकेत साळुंके आणि मुख्य प्रवर्तक भिकू साळुंके यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या भावी उपक्रमांची माहिती दिली. समाजातील एकोप्याची भावना अधिक दृढ करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील युवकांनी शिक्षण, उद्योग, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे शिल्पकार व राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या कणखर नेतृत्वाचा गौरव केला. समाजहितासाठी संघटना खंबीरपणे पाठीशी उभी असून सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्यात सातत्याने योगदान देत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
हा यशस्वी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सक्रिय पदाधिकारी अशोक शेलार, सुभाष साळुंके, रविंद्र साळुंके, विनोद साळुंके, राजेंद्र साळुंके आणि प्रदीप साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे स्नेहसंमेलन आणि सत्कार समारंभ यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.




